पुणे : उरुळी कांचन (हवेली) येथे महात्मा गांधी प्रेरित निसर्गोपचार आश्रम चा ८१ वा स्थापना दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ‘निसर्गोपचार म्हणजे फक्त उपचार नव्हे, तर संपूर्ण जीवनपद्धती’ हा जोरदार संदेश देण्यात आला

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे स्पष्ट आणि थेट भाषण. त्यांनी थेट इशारा देत सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणावजन्य आजार झपाट्याने वाढत आहेत. “औषधांवर अवलंबून राहू नका, जीवनशैली बदला!” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
महात्मा गांधींनी १९४६ साली उभारलेला हा आश्रम आज जागतिक स्तरावर पोहोचला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. साधेपणा, शिस्त आणि निसर्गाशी सुसंगत जीवन हेच खरे आरोग्याचे गमक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनीही परिस्थितीचे गांभीर्य मांडताना वाढते प्रदूषण, निकृष्ट अन्न आणि वाढती लोकसंख्या यामुळे आरोग्य संकट निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. “आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार यांचा प्रसार हा आता पर्याय नाही, तर गरज आहे,” असे सांगितले.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी स्वदेशी उपचारपद्धतींना पाठबळ देत केंद्र सरकारच्या आयुष धोरणाचे कौतुक केले. “आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी आरोग्यपद्धतीच कणा ठरणार,” असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आश्रमाला ‘जीवनशैली घडविणारे केंद्र’ म्हणत गांधी विचारांचा पुनरुच्चार केला. “खेड्याकडे चला हा विचार केवळ घोषवाक्य नाही, तर विकासाचा मार्ग आहे,” असे त्यांनी सांगितले.
आश्रमाचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. नारायण हेगडे यांनी गेल्या ८ दशकांचा आढावा घेत आश्रमाच्या कार्याची ताकद मांडली. आरोग्यसेवा, ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन यासोबतच शेतकऱ्यांसाठी गाईंच्या वंशसुधारणा आणि प्रशिक्षण उपक्रमही राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
याच वेळी ‘आमच्या आनंदाचे रहस्य’ या पुस्तकाचे प्रकाशनही पार पडले. कार्यक्रमाला डॉ. अभिषेक देवीकर, ज्ञानेश्वर (माऊली) कटके, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उरुळी कांचनमध्ये या सोहळ्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.