पुणे : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गट क्रमांक ३८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात रंगलेली लढत अखेर राष्ट्रवादीच्या बाजूने झुकली. राष्ट्रवादीच्या सुरेखा हरगुडे यांनी तब्बल ९,०३४ मतांच्या प्रचंड फरकाने भाजपच्या कविता पायगुडे यांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. या निकालाने कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादीने आपले वर्चस्व ठसवले आहे.

सुरेखा हरगुडे यांना १८,८७२ मते मिळाली, तर कविता पायगुडे यांना ९,८३८ मतांवर समाधान मानावे लागले. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीची आघाडी कायम राहिली आणि अखेर भाजपला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषद सदस्यपद राष्ट्रवादीकडे गेल्याने स्थानिक राजकारणात अजित पवार गटाने पुन्हा एकदा ताकद दाखवून दिली आहे.

मात्र, पंचायत समितीच्या केसनंद गण क्रमांक ७५ मध्ये चित्र वेगळे पाहायला मिळाले. भाजपचे कुशाल सातव यांनी राष्ट्रवादीचे प्रमोद हरगुडे यांचा ४,४३७ मतांनी पराभव करत भाजपची बाजू मजबूत केली. सातव यांना १०,८१४ मते मिळाली, तर हरगुडे यांना ६,३७७ मते मिळाली. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषदेत झालेल्या पराभवाची काहीशी भरपाई भाजपने येथे केली.

दरम्यान, सर्वाधिक थरारक सामना नायगाव गण क्रमांक ७६ मध्ये रंगला. राष्ट्रवादीचे मनोज उर्फ कृषीराज चौधरी यांनी भाजपचे सूरज चौधरी यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव केला. मनोज चौधरी यांना ५,५४१ मते मिळाली, तर सूरज चौधरी ५,५३७ मतांवर थांबले. चार मतांच्या या फरकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे सूरज चौधरी हे पूर्वी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते आणि आमदार माऊली कटके यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या बंडखोरीचा फटका अखेर त्यांनाच बसल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले.

केसनंद गणात मतदानादरम्यान शाब्दिक बाचाबाची, बोगस मतदानाच्या आरोपांवरून झालेली मारहाण यामुळे वातावरण तापले होते. तरीही जनतेने निकालाद्वारे आपला कौल स्पष्ट दिला.

एकूण चित्र पाहता, कोरेगाव मूळ गटात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली, तर पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकत सामना बरोबरीत ठेवला. मात्र जिल्हा परिषदेत मिळालेला मोठा विजय राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *