पुणे : “आयुष्याची दैना कधी तरी संपेल” या आशेवर जगणाऱ्या गरीब व आदिवासी समाजाच्या नशिबी मात्र जिवंतपणीच नव्हे, तर मृत्यूनंतरही उपेक्षाच येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. घर नाही, हक्काची जागा नाही, शासकीय सवलती नाहीत आणि उघड्यावरचे जीवन—ही फरफड आयुष्यभर सुरूच असते; मात्र मृत्यूनंतर तरी सन्मानाने दफन होईल का, हा प्रश्नही अनेक कुटुंबांसमोर उभा राहतो.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अशीच एक हृदयद्रावक घटना घडली. अत्यंत गरीब पिढीत समाजातील एका तरुणाचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

महोळ (झाडाची फांदी) काढण्यासाठी तो झाडावर चढला असताना हा अपघात झाला. मात्र, मृत्यूनंतर कुटुंबावर आणखी एक आघात झाला—प्रेत दफन करण्यासाठी हक्काची जागाच मिळेना.
दिवसभर आणि रात्रभर कुटुंब प्रेत घेऊन गावोगावी फिरत होते. अखेर रात्री दोनच्या सुमारास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या पुढाकारामुळे प्रशासन हालले.

उपविभागीय पोलिस अधिकारी भवर, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख आणि श्रीरामपूर पोलिसांच्या बंदोबस्तात मृत व्यक्तीच्या उपस्थितीत रात्री दीड वाजता प्रेताचे दफन करण्यात आले. ही अमानवी परिस्थिती थांबवण्यासाठी आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे वास्तव समोर आले, प्रशासन जागे झाले आणि अखेर दफनासाठी जागा उपलब्ध झाली. भोसले यांनी केवळ या एका घटनेपुरते न थांबता, आतापर्यंत तब्बल सात हजारांहून अधिक गरीब व आदिवासी कुटुंबांतील मृत व्यक्तींना दफनासाठी हक्काची जागा मिळवून दिली आहे.
समाज जिवंतपणी ज्यांना नाकारतो, त्यांना मृत्यूनंतर तरी माणुसकीचा सन्मान मिळावा, यासाठी सुरू असलेला हा संघर्ष प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

श्रीरामपूरातील ही घटना केवळ एका कुटुंबाची नसून, आजही अस्तित्वासाठी झगडणाऱ्या गरीब आदिवासी समाजाच्या वेदनांचे वास्तव प्रतिबिंब आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *