णे : प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात यंदा पर्यावरण क्षेत्रातील एका महान कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा होत आहे. देशभर ‘पीपल बाबा’ म्हणून ओळखले जाणारे स्वामी प्रेम परिवर्तन यांचा २६ जानेवारी रोजी ६० वा वाढदिवस म्हणजेच हीरक महोत्सव आहे. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी वृक्षारोपणाची चळवळ सुरू करणाऱ्या पीपल बाबांनी आज देशातील १८ राज्यांमध्ये हिरवाई पसरवली आहे.

पीपल बाबांचा जन्म २६ जानेवारी १९६६ रोजी चंदीगड येथे लष्करी डॉक्टरच्या कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव आझाद जैन. मात्र, त्यांच्या पर्यावरणीय कार्याची खरी पाळेमुळे पुणे शहरात रुजली. १९७७ साली पुण्यातील खडकी मिलिटरी स्टेशन येथे त्यांनी पहिले झाड लावले. इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेतून सुरू झालेला हा प्रवास गेली ४७ वर्षे अखंड सुरू आहे.
झाडे लावतानाच त्यांचे संवर्धन करण्यावर पीपल बाबांचा विशेष भर राहिला. पिंपळ व कडुलिंब यांसारख्या अधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची त्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. आजपर्यंत त्यांनी १ कोटी २७ लाखांहून अधिक पिंपळाची झाडे लावली व जोपासली आहेत. याच कार्यामुळे त्यांना ‘पीपल बाबा’ हे नाव मिळाले.

देशातील २०२ जिल्ह्यांमध्ये त्यांनी एकूण २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक झाडे लावली आहेत. त्यांच्या ‘गिव्ह मी ट्रीज’ या संस्थेशी १५ हजारांहून अधिक स्वयंसेवक जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे, ते झाड लावून थांबत नाहीत, तर किमान तीन वर्षे ते जगवण्याची जबाबदारी स्वतः घेतात.
ओशो रजनीश यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या पीपल बाबांचे तत्त्वज्ञान साधे आहे “निसर्गाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा.”
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वृक्षारोपण करून पर्यावरणप्रेमी हा दिवस साजरा करत आहेत