पुणे : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या वतीने “बूटस्ट्रॅप तंत्रज्ञान वापरून वेब डेव्हलपमेंट” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी एलिट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी पंजाला हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर संगणक विभाग प्रमुख प्रा. वैशाली चौधरी, प्रा. प्रतीक आढाव तसेच कार्यशाळेचे समन्वयक प्रा. हर्षल भोसले उपस्थित होते.

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना चालना मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंटचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच HTML, CSS आणि बूटस्ट्रॅपच्या सहाय्याने आकर्षक व प्रतिसादक्षम (रेस्पॉन्सिव्ह) वेबसाइट तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. ग्रीड सिस्टम, बटन्स, फॉर्म्स, नवबार आणि कार्ड्स यांसारख्या बूटस्ट्रॅपमधील महत्त्वाच्या घटकांची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष उदाहरणे आणि प्रात्यक्षिक सत्रांमुळे विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंटची संकल्पना अधिक स्पष्ट झाली. सहभागी विद्यार्थ्यांना स्वतःची वेबसाइट तयार करण्यासाठी स्वामी पंजाला यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पायल खाचणे व कु. प्रांजल लेचरूड यांनी केले, तर प्रा. हर्षल भोसले यांनी आभार मानले. यावेळी प्रा. मयुरी शितोळे, प्रा. गौरव टिळेकर, प्रा. ऋतुजा कुंभार, प्रा. प्राजक्ता थोरात, प्रा. अनुजा शिंदे, प्रा. केतकी साळुंखे, प्रा. मनाली नागवडे तसेच संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *