पुणे : शासनाच्या महसूल सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले छत्रपती महाराजस्व अभियान – समाधान शिबीर अष्टापूर येथे उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने मार्गदर्शन आणि उपाययोजना करण्याचा प्रयत्न या शिबिरात करण्यात आला.
या शिबिराला आमदार माऊली आबा कटके, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, सुभाष अप्पा जगताप (अध्यक्ष – यशवंत सहकारी साखर कारखाना), गटविकास अधिकारी आशिष शेलार, तालुका कृषी अधिकारी अमित रनावरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी छत्रपतींच्या आदर्शांवर चालत जनतेची सेवा करण्याचा संकल्प मान्यवरांनी व्यक्त केला. यानंतर महसूल विभागाच्या विविध सेवांची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी महसूल सेवांच्या QR कोड वाचनालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही संकल्पना पुणे जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आली असून मोबाईलद्वारे महसूल सेवांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
या शिबिरात नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आल्या. अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले असून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर तत्परतेने मार्गदर्शन केले. तसेच संजय गांधी निराधार योजना, बिबट्या हल्ल्यात बाधित लाभार्थी तसेच जातीचे प्रमाणपत्र यांसारख्या विविध शासकीय योजनांचे लाभ मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या १५ महत्त्वपूर्ण सेवांबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि सेवांचा लाभ कसा घ्यायचा याबाबत माहिती देण्यात आली. शिबिरात आलेल्या सर्व गरजू नागरिकांचे अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी नोंद करण्यात आली.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मंडळ अधिकारी गीताश्री काळे, तसेच अपर तहसील कार्यालयातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी नागरिकांना योग्य मार्गदर्शन करत शिबिर सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
दरम्यान, दुपारनंतर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी नागरिकांच्या मागणीनुसार परिसरातील रस्त्याच्या कामाबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून तत्काळ निर्णय घेण्याची भूमिका यावेळी दिसून आली.
या कार्यक्रमाला अष्टापूरच्या विद्यमान सरपंच पुष्पा सुरेश कोतवाल, उपसरपंच संजय भिकू कोतवाल, माजी उपसरपंच सोमनाथ माणिक कोतवाल, माजी सरपंच कविता योगेश जगताप, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शामराव दादा कोतवाल, माजी संचालक श्रीहरी दादा कोतवाल यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सोसायट्यांचे चेअरमन, शेतकरी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि प्रशासनाचे समन्वय यामुळे छत्रपती महाराजस्व अभियान – समाधान शिबीर अष्टापूर येथे यशस्वीरीत्या पार पडले. शासनाच्या योजना आणि सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.