पुणे : जेके फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत सोरतापवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी ‘पारंबी कलादालन’ या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वटवृक्षाच्या पारंबीसारखीच नवनिर्मिती, विस्तार आणि समृद्धी यांचे प्रतीक म्हणून या कलादालनाला ‘पारंबी’ असे नाव देण्यात आले असल्याची माहिती आयोजक शीतल जयप्रकाश चौधरी यांनी दिली.
वटवृक्षाची पारंबी केवळ सौंदर्य वाढवत नाही तर मातीत रुजून वृक्षाला अधिक समृद्ध करते. याच भावनेतून गावातील महिलांना प्रगतीची नवी वाट मिळावी, त्यांनी पुढील ध्येयांकडे वाटचाल करावी, या सकारात्मक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कलादालनामध्ये सोरतापवाडीतील महिला उद्योजिकांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, वस्त्रे, विणकाम, हातमाग व हस्तकलेच्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. महिलांना त्यांच्या कलेचे सादरीकरण व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. यासोबतच लहान मुलांसाठी खेळजत्रेचेही आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत हनुमान मंदिरासमोर, सोरतापवाडी येथे होणाऱ्या या ‘पारंबी कलादालन’ला सर्व गावकऱ्यांनी आवर्जून भेट देऊन गावातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे विनम्र आवाहन मुख्य आयोजक शितल जयप्रकाश चौधरी यांनी केले आहे.
