पुणे : अहिल्यानगर, शिर्डी येथे पार पडलेल्या विभागीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमधील १७ वर्षांखालील मुलींनी दमदार खेळ सादर करत तृतीय क्रमांकावर समाधान मानले. या स्पर्धेत झालेल्या तीन डावांमध्ये श्रेया तरस हिने उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीची सांगड घालत अष्टपैलू कामगिरी केली.

या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुण्यातील तीन मुलींसह एकूण १६ विद्यार्थिनींची महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघासाठी निवड झाली असून त्यात श्रेया तरसचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या संघात स्थान मिळवणारी श्रेया ही केवळ १३ वर्षे ६ महिन्यांची असून सर्वात कमी वयाची खेळाडू म्हणून राज्य संघात निवड झाली आहे. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणारी श्रेया आगामी राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी या शाळेची पहिली राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू ठरली आहे.

शाळेच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी व क्रीडा शिक्षक चंद्रकांत ठोंबरे यांचे श्रेयाला मार्गदर्शन लाभले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील तसेच उद्योजक नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी श्रेयाच्या कामगिरीचे कौतुक करत तिला आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *