पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील तळवडी चौक येथे भरधाव वेगाने येणाऱ्या बल्कर ट्रकने दिलेल्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) मध्यरात्री घडली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम बबन भंडारे (वय ५३, रा. उरुळीकांचन, शिंदवणे चौक, ता. हवेली, जि. पुणे) हे पुणे–सोलापूर महामार्ग ओलांडत असताना हा अपघात झाला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळवडी चौक येथे ते महामार्गाच्या

मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर थांबले होते. वाहनांची रहदारी कमी झाल्यानंतर ते सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी लेन पायी ओलांडत असताना सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बल्कर ट्रक (क्र. MH१२SX८९८५) ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात पाठविले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मृताचे कन्या प्रिती मयूर शेंबेकर (वय ३०, रा. दुर्गा कॉलनी १, डांगे चौक, चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक प्रणव प्रदीप शिंदे (वय २०) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद सहायक फौजदार सुनील सस्ते यांनी केली असून पुढील तपास सहायक फौजदार भोसले करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *