पुणे : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यानिमित्त १ जानेवारी रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवाशांच्या सोयीसाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२६ या दोन दिवसांत एकूण ८५५ मोफत बस उपलब्ध करून दिल्या आहेत.
लोणीकंद व शिक्रापूर विभागातून विजयस्तंभ परिसरात जाण्यासाठी विनातिकीट प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे.
पीएमपी प्रशासनाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष नियोजन करण्यात आले आहे. लोणीकंद विभागातून ३१ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान, खंडोबा माळ, चिंचबन, फुलगाव शाळा व पेरणे गाव या मार्गावर ७५ बस सोडण्यात येणार आहेत. त्याच मार्गावर १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पेरणे टोल नाक्यापर्यंत २५० बस धावणार आहेत. या विभागातून एकूण ३२५ बसचे नियोजन करण्यात आले आहे.
शिक्रापूर विभागातून ३१ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून शिक्रापूर रस्ता, जीत पार्किंग वक्फ बोर्ड, पिंपळे जगताप–चाकण रस्ता ते विजयस्तंभापर्यंत १४० बस धावतील. तसेच वढू पार्किंग (इनामदार हॉस्पिटल) ते वढू गावदरम्यान १० बस सोडण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत ३५० बस व वढू पार्किंगहून ३० बस अशा एकूण ३८० मोफत बस उपलब्ध असतील.

शहरातून जादा बससेवा
शहरातील प्रमुख स्थानकांवरून नियमित मार्गांवरील २७ बसांसह अतिरिक्त ७८ बस अशा एकूण १०५ बस लोणीकंद कुस्ती मैदानापर्यंत धावणार आहेत. यामध्ये पुणे स्टेशन (मोलेदिना बस स्थानक) येथून ५६, मनपा भवन येथून ३८, दापोडी मंत्री निकेतन येथून २, ढोले पाटील रस्त्यावरून २, अप्पर डेपो येथून ४ आणि पिंपरी आंबेडकर चौकातून ३ जादा बसचा समावेश आहे.
