पुणे : लोणी काळभोर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या पूर्ण उच्चाटनासाठी पोलिसांकडून सातत्याने मोहिमा राबविण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २०२५ मध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी पानटपऱ्या तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायद्यानुसार एकूण १०४ कारवाया केल्या असून २ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलिस ठाणे हद्दीतील पानटपरी चालविणारे तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्रेते यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत संबंधित व्यवसायासाठी आवश्यक अधिकृत परवाने घेणे, तसेच शासनाने घातलेल्या निर्बंधानुसार गुटखा, सुगंधित तंबाखू, ई-सिगारेट आदींची विक्री पूर्णपणे बंदीस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अवैध पदार्थ विक्री करताना आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.
या बैठकीस ४३ पानटपरी चालक, मालक उपस्थित होते. बैठकीदरम्यान पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, अंकुश बोराटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी पोलिस हवालदार रवि आहेर यांनी आभार मानले.
