पुणे : सामाजिक वनीकरण विभाग, पुणे व राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात “कृषिवानिकी, वनशेती व औषधी वनस्पती” या विषयावर राज्यस्तरीय शेतकरी प्रशिक्षण व क्रेता-विक्रेता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास राज्यभरातील शेतकरी, उद्योजक व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू. आय. याटबॉन यांच्या हस्ते वृक्षबियांची माळ सोडून करण्यात आले. चैत्र महिन्यात बियाणे संकलन व रोपनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला. बेहेडा, बिवळा, अर्जुन, शिकेकाई, समुद्रशोक, आपटा आदी वृक्षांच्या बियांचा समावेश असलेल्या माळेमुळे कार्यक्रमाला वैशिष्ट्य प्राप्त झाले.

मेळाव्यात विविध शेतकरी व संस्थांनी कृषिवानिकी व औषधी वनस्पतींवरील उत्पादने व मॉडेल्सचे प्रदर्शन मांडले. मधुमक्षिका पालन, चंदन व बांबू लागवड, सेंद्रिय शेती, रेशीम शेती तसेच औषधी वनस्पतींच्या प्रक्रियायुक्त उत्पादनांबाबत माहिती देण्यात आली. या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना पर्यायी शेतीविषयी नवे मार्गदर्शन मिळाले.
उद्घाटन सत्रात प्रा. काळकर यांनी औषधी वनस्पतींच्या शेतीतून उद्योगनिर्मितीच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. वाढत्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तापूर्ण व प्रमाणित हर्बल उत्पादने तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डब्ल्यू. आय. याटबॉन यांनी कृषिवानिकी पद्धतींचा अवलंब करून उत्पन्नवाढ साधता येईल, असे नमूद केले.
उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी नापीक जमिनीवर वनशेतीद्वारे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचे आवाहन केले.
तांत्रिक सत्रांमध्ये कृषिवानिकी संकल्पना, वनशेतीतील संधी, कागद उद्योगासाठी लागणारे वृक्ष, शासकीय योजना, बँक कर्ज, तसेच मधुमक्षिका पालन व चंदन लागवड याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
विक्रेता-विक्रेता संवाद सत्रात बाजारपेठेतील मागणी, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यावर चर्चा झाली.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. तसेच “फायदेशीर वनशेती, चंदन लागवड व औषधी वनस्पतींची शेती” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
शेवटी वनस्पती उद्यानात प्रात्यक्षिकाद्वारे औषधी वनस्पतींची ओळख व लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्यास एकूण २७५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. आयोजनाबद्दल सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.