पुणे: वाकड – विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कस्पटे वस्तीतील सभेत स्थानिक नागरिकांना विकासाची ठोस आश्वासने दिली होती. विरंगुळा केंद्र, खेळाचे मैदान, उद्यान अशा सार्वजनिक सुविधांचा आराखडा मांडत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला होता. मात्र निवडणुकीनंतर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
स्थानिकांसाठी राखून ठेवलेला हा बहुमोल भूखंड थेट एका बिल्डरकडे देण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर कस्पटे वस्ती–वाकड परिसरात तीव्र संताप उसळला आहे. सार्वजनिक हितापेक्षा खासगी गटांना प्राधान्य देणारा हा निर्णय नागरिकांच्या भावना दुखावणारा असून ‘दिलेला शब्द मोडला’ असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या घडामोडींमुळे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जोरदार निषेध आंदोलनाला सुरुवात केली आहे. “हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्या आणि आमच्यावर दिलेली आश्वासने पूर्ण करा,” अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“जनतेचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही; दिलेला शब्द पाळला जाईपर्यंत लढा सुरू राहील,” असे ठाम मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या संपूर्ण आंदोलनाला आम आदमी पार्टीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून नागरिकांच्या हक्कांसाठी त्या पक्षानेही आवाज उठवला आहे.
