पुणे : ड्रग्स, गांजा व अंमलीपदार्थ मुक्त शहर अभियानांतर्गत लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच घरातील दोन सराईत गांजा विक्रेत्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध अंमलीपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात ड्रग्सविरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गांजा व इतर अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध ठोस व परिणामकारक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररित्या गांजा विक्री करणारे रेकॉर्डवरील आरोपी आकाश संतोष भाले (वय २३, रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) तसेच मंगल संतोष भाले (वय ४०) हे दोघेही प्रतिबंधक कारवाईकडे दुर्लक्ष करून सातत्याने गांजा विक्री व इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले. त्यांच्या कारवायांमुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यसनाधीन होत असल्याची तक्रार होती. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी संबंधित आरोपींविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस उपआयुक्त परिमंडळ ६ यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलिस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दोन्ही आरोपींना दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले आहेत.

ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली.

दरम्यान, अशाप्रकारे बेकायदेशीर धंदे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *