पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुरस्कृत कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. बैठकीत पुणे महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासोबत लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले.
पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक उमेदवारांसाठी अर्जफॉर्मचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत पक्षाच्या मुख्य कार्यालयात छापील अर्जफॉर्म उपलब्ध राहतील. उमेदवारांनी निर्धारित सर्व माहिती अचूक भरून, दिलेल्या मुदतीत अर्ज जमा करण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
बैठकीस शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, बाबूराव धाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, शहर महिला अध्यक्षा हिमाली कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
