पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आणि फिनोलेक्स पाईप, मुकुल माधव फाउंडेशन तसेच फिक्की फ्लो यांच्या सहकार्याने संकल्प संस्थेमार्फत बाएफ सीएचआरसी, उरुळी कांचन येथे गायीच्या दुधाचे अत्याधुनिक एटीएम दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सुरू करण्यात आले. या मिल्क एटीएमचे उद्घाटन फिक्की फ्लोच्या चेअरपर्सन अनिता अग्रवाल यांच्या हस्ते झाले. प्रारंभी डॉ. मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास मुकुल माधव फाउंडेशनचे पार्थ सर, फिक्की फ्लोच्या गायत्री मॅडम, बाएफ संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. जयंत खडसे, एस. व्ही. कुलकर्णी, प्रीतम चांडक, सुजाता कानगुडे, प्रशांत दुधाडे, डॉ. लता शर्मा तसेच पत्रकार सुनील तुपे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुजाता कानगुडे यांनी बाएफ संस्थेच्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. व्यासपीठावरील मान्यवरांनी संकल्प संस्थेच्या महिलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. संकल्प संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा कांचन यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. सुषमा म्हस्के आणि सिंधू मोरे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्या अनिता अग्रवाल यांनी महिलांसाठी फिक्की फ्लोच्या माध्यमातून बाएफच्या सहकार्याने नवीन उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लता शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन नीता खराडे व सविता कांचन यांनी तर आभार प्रदर्शन हनुमंत भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विमल थोरात, सागर पारखे आणि संकल्प संचालक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. संकल्प संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
