पुणे : पुणे शहर पोलिस यांनी राजस्थानमध्ये धडक देत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या व्यापक कारवाईत एकूण १ किलो ९६० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले असून मोबाईल, फॉर्च्युनर वाहन आणि रोख रकमेसह एकूण ₹४,२७,०९,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास खराडी येथील ईओएन फेज–२ मागील गेट परिसरात सार्वजनिक रस्त्यावर दोन इसमांकडून २७ ग्रॅम एम.डी. व इतर साहित्य असा सुमारे ₹१२,४१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६, कलम ८(क), २१(ब), २९ एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे व गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त निखील पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन एम.डी. रॅकेटचे मूळ जाळे उघड करण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके गठित करण्यात आली.
प्राथमिक अटक आरोपी मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (रा. वाघोली) व हरीष सुजना रामदेवासी (रा. वाघोली) हे मूळचे जोधपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. ते गेल्या वर्षभरापासून राजस्थानहून एम.डी. आणून पुणे परिसरात विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले.

दि. ७ फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार योगेश उर्फ मनीष बिष्णोई याला वाघोली येथे सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५१ ग्रॅम एम.डी. (₹३०,२०,०००) जप्त करण्यात आले. पुढील तपासात सचिन उर्फ एस.के. बिष्णोई याला हडपसर–मुंढवा परिसरातून ताब्यात घेऊन ₹४,६५,००० रोख रक्कम जप्त करण्यात आली.
आरोपींच्या कबुलीनुसार मांजरी बुद्रुक येथील अमित घुले याला त्याच्या फॉर्च्युनर वाहनासह अटक करून ३९८ ग्रॅम एम.डी. (₹७९,६०,०००) व दोन मोबाईल जप्त करण्यात आले. त्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने राजस्थानमध्ये कारवाई करून मुख्य वितरक रतनलाल जाठ याला अटक केली. त्याच्याकडून १,३८४ ग्रॅम एम.डी. (₹२,७६,८०,०००) जप्त करण्यात आले. फरार आरोपी रामकरण जाट यालाही ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत असून, एम.डी. रॅकेटशी संबंधित उर्वरित दुव्यांचा शोध सुरू आहे.