पुणे : हिंजवडी आयटी पार्क टप्पा क्रमांक तीनमधील मेगापोलीस सोसायट्यांच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे वाढलेल्या हवा व ध्वनिप्रदूषणाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गोदरेज प्रॉपर्टीज, पेगसिस प्रॉपर्टीज, रेयांश लॉजिस्टिक्स आणि गेरा डेव्हलपमेंट्स या चार विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी १६ डिसेंबर रोजी संबंधित बांधकामस्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी माती व राडारोडा वाहून नेणारी वाहने आच्छादित न करता खुलेपणाने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असून, हवा व ध्वनिप्रदूषणात लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
मेगापोलीस परिसरात एकूण आठ गृहनिर्माण सोसायट्या असून, त्यामध्ये सुमारे आठ हजार सदनिका आहेत. सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील खोदकामातून निघणाऱ्या राडारोड्याची वाहतूक खुल्या वाहनांतून केली जात असल्याने रस्त्यांवर धूळ साचत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पूर्वी या परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) सुमारे ७० इतका होता. मात्र सध्या तो १५० ते २०० दरम्यान पोहोचल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. विकासकांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान, एमआयडीसीने विकासकांना तातडीने प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल महामंडळाकडे सादर करण्याचे निर्देश नोटिसांद्वारे देण्यात आले आहेत.
