पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहर महिला आघाडीच्या शहर सरचिटणीसपदी सायली विजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष हिमाली कांबळे यांच्या हस्ते पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्तेही त्यांना अधिकृत पत्र देण्यात आले.
या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सायली पवार गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील नागरी सुविधा, शालेय साहित्य वाटप, महिला बचत गटांना प्रोत्साहन तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे. पदवीधर असलेल्या पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठीही विशेष योगदान दिले आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे शिवाजीनगर मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षाच्या विस्तारास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष हिमाली कांबळे यांनी व्यक्त केला.
