पुणे : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, लोणी काळभोर (पुणे झोन) येथे संत निरंकारी मिशनच्या आव्हाळवाडी सेक्टरअंतर्गत आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, लोणी काळभोर, उरुळी कांचन, केशवनगर, हिंगणगाव आणि वाडे बोल्हाई या शाखांच्या वतीने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे रविवारी (दि. ८ मार्च २०२६) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात मिशनचे अनुयायी तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ११६ युनिट रक्तदान केले. या शिबिरात संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले (मुंबई) यांनी ७६ युनिट तर औंध रक्तपेढीने ४० युनिट रक्त संकलन केले.
शिबिराचे उद्घाटन सेक्टर संयोजक श्री. दत्तात्रय सातव यांच्या हस्ते झाले. यावेळी लोणी काळभोरचे माजी सरपंच श्री. राहुल दत्तात्रय काळभोर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिशनच्या कार्याचे कौतुक केले.
संत निरंकारी मिशनचे संस्थापक बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’ असा संदेश दिला होता. मिशनचे अनुयायी हा संदेश आचरणात आणत असून सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सातत्याने पुढे नेले जात आहे.
संत निरंकारी मिशनतर्फे आव्हाळवाडी परिसरात मानवतेच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी शिबिर, महिला सशक्तीकरण, बालविकास तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
या सामाजिक कार्यासाठी भारत सरकार व विविध राज्य सरकारांकडून मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संत निरंकारी सेवादल व मिशनच्या अनुयायांचे विशेष योगदान लाभले.

रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी आव्हाळवाडी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांना रक्तदानाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित सर्व रक्तदाते व मान्यवरांचे आभार लोणी काळभोर सत्संग मुखी श्री. राहुल काळभोर यांनी मानले. क्षेत्रीय संचालक (पुणे सिटी) अवनीत तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल व स्वयंसेवकांनी कार्य केले.
पुणे झोनमधील आव्हाळवाडी सेक्टरचे संयोजक, मुखी, सेवादल व स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.