पुणे : डॉ. मोहन धारिया यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वनराई पर्यावरण बालोत्सवाला पुणे जिल्ह्यातील तब्बल ७० शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणांद्वारे आपली कलागुणांची छाप पाडली.

या स्पर्धेत संत यादवबाबा माध्यमिक विद्यालय शिंदवणे (ता. हवेली, जि. पुणे) या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाने ‘आम्ही वनराई वारकरी’ हे पर्यावरण विषयावर आधारित कीर्तन सादर केले होते. वारकरी संप्रदायाच्या परंपरेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे हे कीर्तन परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कीर्तनातून वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि निसर्ग संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. सादरीकरणातील शब्दरचना, वेशभूषा, सादरीकरणाची शैली आणि सामूहिक सहभाग यामुळे कार्यक्रम अधिक उठावदार ठरला.

या यशाबद्दल विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करताना पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
वनराई पर्यावरण बालोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी चालना मिळाली असून संत यादवबाबा विद्यालयाच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याला नवी उभारी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *