पुणे: मराठी सिनेमाचे वैशिष्ट्य कायमच आपल्या परंपरा जपत जुन्या-नव्याची सांगड घालत भावनात्मक कथा मांडण्याचे राहिले आहे. अशीच मूल्यांची गुंफण असलेला ‘सावित्री कलियुगातील’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्रात साजरा केल्या जाणाऱ्या वटसावित्री सणाच्या पाश्र्वभूमीवर आधारित ही कथा आहे. सत्यवान-सावित्रीच्या प्रेम, निष्ठा आणि संघर्षाचा वारसा आजच्या आधुनिक काळात कसा दिसतो, याचा वेध हा सिनेमा घेणार आहे.
आजही अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत पतीच्या आयुष्याची दीर्घायुष्याची कामना करतात; परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे नात्यांचे स्वरूप बदलताना दिसते. नाती जपण्यामध्ये होणारी कमतरता, वाढती दुरावलेली नाती आणि कुटुंबातील अती लाडामुळे बिघडणारी मुलांची मानसिकता असे विषय या चित्रपटात अधोरेखित केले आहेत. तरीही संकटसमयी सावित्रीप्रमाणे स्त्री पतीच्या पाठिशी उभी राहते, तसेच मुलावर संकट आल्यास आई त्याला कसा आधार देते, हे नातेसंबंधांचे सूक्ष्म पैलू चित्रपटात अनुभवायला मिळणार आहेत.
गुरु एंटरटेनमेंट अँड इन्फो मीडिया ग्रुपचा हा पहिला मराठी चित्रपट असून कथा, पटकथा आणि दिग्दर्शन प्यारेलाल शर्मा यांनी केले आहे. सहनिर्माते नानासाहेब बच्छाव आणि रवीकुमार गजभिये आहेत. तर चित्रपटाचे वितरक म्हणून गुरु एंटरटेनमेंटचे कैलाश गरुड कार्यभार सांभाळत आहेत.
चित्रपटात नायकाच्या भूमिकेत पवन चौरे असून, नकारात्मक भूमिकेत महेक, श्री जयराज नायर आणि नानासाहेब बच्छाव दिसणार आहेत. प्रमुख भूमिकेत अभिनेत्री श्वेता भांबरे यांनी काम केले असून, इतर कलाकारांमध्ये निशान पवार, रवीकुमार गजभिये, श्री जी.एस. पाटील, श्री राकेश शिर्के तसेच बालकलाकार नमो गजभिये यांचा समावेश आहे. संवाद लेखन सुजाता पवार आणि राकेश शिर्के यांनी केले आहे.
या चित्रपटात लीड रोल करण्याचा योग आल्याचे सांगताना अभिनेत्री श्वेता भांबरे म्हणाल्या, “या चित्रपटामुळे आयुष्यात खूप काही शिकायला मिळाले. ही कथा आदर्श घेण्यासारखी असून सर्वांनी हा चित्रपट पाहावा.” वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक यांनीही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा यांनी घेतलेल्या परिश्रमांनंतर ‘सावित्री कलियुगातील’ हा चित्रपट २६ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांनी एकदा तरी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
