पुणे: लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेली मोहिम अधिकाधिक प्रभावी ठरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, अवैध दारू, गांजा, जुगार अशा विविध गैरकृत्यांवर सतत धडक कारवाया सुरू आहेत.

दि. ०७ डिसेंबर २०२५ रोजी पन्हाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हद्दीत गस्तीदरम्यान थेऊर फाट्याजवळील राखपसरे वस्ती येथे दोन महिलांवर गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याप्रकरणी कारवाई केली. पहिल्या कारवाईत तुळसाई निवृत्ती राखपसरे (वय ६०) ह्या महिला रसायन व साहित्यांसह हातभट्टी दारू तयार करताना आढळल्या. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २३५ लीटर तयार रसायन व साहित्य असा एकूण ११,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गु.र.नं. ५५१/२०२५ महा. दारूबंदी अधिनियम ६५ फ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या कारवाईत सविता मोहन राखपसरे (वय ३४) ही महिला १२० लीटर हातभट्टी दारू तयार करताना पोलिसांच्या पथकास मिळून आली. या कारवाईत ६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गु.र.नं. ५५०/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पन्हाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत अवैध दारूवर १०३, अवैध गांजा विक्रीवर १४, जुगार अड्ड्यांवर ३५ आणि गुटखा वाहतूक व साठा प्रकरणात १ अशी एकूण १५३ कारवाया करून तितकेच दखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय दोन मटका चालकांवर एमपीडीए कारवाई, एक जुगार चालक आणि एक अवैध दारू विक्रेत्या महिलेस तडीपार करण्यात आले आहे.

यापुढेही हद्दीतून अवैध धंद्यांचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *