पुणे : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय येथे शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व विधिवत पूजन करून करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते पूजन झाले.
प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी मनोगत व्यक्त करताना शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान अधोरेखित केले. स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणताना त्यांनी दाखविलेली दूरदृष्टी, शौर्य, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी प्रशासन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवरायांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख, कर्तव्यदक्ष व जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी धुमाळ, कला विभाग प्रमुख डॉ. समीर आबनावे, संगणक विभाग प्रमुख प्रा. वैशाली चौधरी, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश शितोळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमोल बोत्रे, ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर, प्रा. प्रतिक आढाव यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभागातील सदस्य तसेच कार्यालयीन कर्मचारी मोरेश्वर बगाडे, विशाल महाडिक आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांच्या शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *