पुणे : दैनिक साहित्य लीला पंढरी, पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी शनिवार पेठेतील ओक सभागृह येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेस व कला मंचचे संस्थापक अध्यक्ष तसेच संगीतकार श्री. शिवराज साने यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे आणि सौ. पौर्णिमा वानखेडे यांच्या शुभहस्ते साने यांचा सन्मान करण्यात आला.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रमांबरोबर कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. अनेक कवींनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवरील कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. कला आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संगीत क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून नवोदितांना प्रोत्साहन देत असलेल्या शिवराज साने यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी संगीत क्षेत्रात प्रगती करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुशील सातपुते यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी कवी रंजीत पवार (जुन्नर) यांनी उपस्थित मान्यवर, कवी आणि रसिकांचे आभार मानले.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यवाचन आणि पुरस्कार वितरणामुळे दैनिक साहित्य लीला पंढरीच्या प्रथम वर्धापन दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.