शुभांगी सरोदे – पुरीगोसावी (प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे अनैतिक संबंधातून उद्भवलेल्या वादातून पती-पत्नीने मिळून प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित पती-पत्नीला अटक केली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव हिचे विजय भीमा राठोड (वय २५, रा. वरसाडे तांडा) याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सोनालीने आपल्या पती संजय परशुराम जाधव याच्या मदतीने विजय राठोड याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

विजय राठोड हा २४ फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संजय जाधव याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी पती-पत्नीने विजय राठोड याची हत्या कशी केली आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबतही पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा करत असून, कबुलीजबाबाची पडताळणी, मोबाईल डेटा व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनेचा उलगडा करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.