पुणे: मौजे आव्हाळवाडी (ता. हवेली) येथे सौ. पल्लवी युवराज काकडे यांच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील नागरिकांसाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भरविण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल १३८० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून शिबिराची उपयुक्तता सिद्ध केली.

या शिबिरामध्ये ९०० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७५३ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय ४७ रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून, आगामी काही दिवसांत या सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. तसेच २ नागरिकांची कृत्रिम हात-पाय मिळण्यासाठी नोंदणी करण्यात आली.

शिबिरात हृदय तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन चाचणी, शुगर चाचणी, रक्तदाब मापन तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या. ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या शिबिराला पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेशबापू सातव, माजी उपसरपंच मंगेश सातव, माजी उपसरपंच प्रशांत सातव, ग्रामपंचायत सदस्य अमोल आव्हाळे, युवानेते किरण आव्हाळे, संकेत आव्हाळे, नितीन आव्हाळे, हर्षल आव्हाळे, सुबोध सातव, निलेश सातव, राम आव्हाळे, विशाल कुटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्याबाबत जनजागृती आणि सेवा देण्याचा आदर्श सौ. पल्लवी युवराज काकडे यांनी या उपक्रमातून घालून दिल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *