पुणे : कुंजीरवाडी (ता. हवेली) शिवजयंती उत्सवानिमित्त श्रीनाथ तरुण मंडळाच्या वतीने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ४५० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. रक्तदान शिबिरात १३२ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या शिबिराचे आयोजन श्रीनाथ तरुण मंडळातर्फे करण्यात आले होते. सौजन्य म्हणून शंतनू सारिका ज्ञानेश्वर धुमाळ (संस्थापक अध्यक्ष, रौद्रशंभू प्रतिष्ठान) तसेच समीर तानाजी धुमाळ (मा. अध्यक्ष, श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट, धुमाळ मळा) यांचे सहकार्य लाभले.

शिबिरात मोफत फूट थेरपी, रक्तदान शिबिर, डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप, हृदयरोग तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच हाडांची तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपासण्या पार पडल्या.

कार्यक्रमाचे उद्घाटन कुंजीरवाडीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने शिबिरास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह महिला, युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

संपूर्ण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *