पुणे : रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट यांच्या पुढाकाराने व अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २२ फेब्रुवारी २०२६) आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नुमवी शाळेसमोर, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर पार पडले.

शिबिराचा सुमारे ३०० ते ४०० नागरिकांनी लाभ घेतला. रिक्षाचालक, वाहनचालक, पायी प्रवास करणारे नागरिक, महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

हे शिबिर चंद्रकांत पाटील (मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.
शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तातील साखर (BSL-R), रक्तगट, रक्तदाब, कोलेस्टेरॉल तसेच रक्तातील घटकांची (HB, RBC, WBC, PLT) तपासणी करण्यात आली. दंत तपासणी, कीड काढणे, सिमेंट भरणे, स्केलिंग व पॉलिशिंग या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
तसेच ४० वर्षांवरील नागरिकांसाठी मोतीबिंदू व काचबिंदू तपासणी, महिलांसाठी ४० ते ६० वयोगटातील स्तन कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) सुविधा देण्यात आली. महिलां व पुरुषांसाठी जवळच्या दृष्टीसाठी मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.

सुमारे १३ हजार ५०० रुपयांच्या आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

शिबिराचे यशस्वी आयोजन अमर भालेराव (तात्या) यांनी केले. धनश्री पांगारे, किर्ती वर्मा, दिनेश डोंगरे, ओंकार बगाडे, प्रथम भालेराव, अमित सातव, साक्षी मुंढे, सोहन बंडीवडार, मानस लबडे, गौरव कुंभार, ओमकार नवले, आयुष लांडगे, गोविंद भोसले, सुमित कुंभार, साई घोणे, अमोल सोयाम, वैभव फल्ले, विश्वनाथ गायकवाड, मंगेश थोरात, सुजल साळेकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *