पुणे: पुणे ग्रामीण जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुका तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाने अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्र बाळगणारे, अमली पदार्थ विक्रेते, अवैध वाळू व्यावसायिक, हातभट्टीवाले व अवैध दारू भट्टी चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर उरुळी कांचन पोलिस ठाणे हद्दीतील शिंदवणे (ता. हवेली) येथील सराईत हातभट्टीवाला क्रिश जॉनी राठोड (वय २०, रा. काळेशिवार, शिंदवणे) याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड व हातभट्टीवाले प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

क्रिश राठोड याच्याविरोधात यापूर्वी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. तो शिंदवणे, काळेशिवार व आसपासच्या गावांमध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, विक्री व वाहतूक करणे, अवैधरीत्या भट्ट्या लावणे, तसेच तक्रारदारांना धमकावणे अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले होते. या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत होता.

उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सदर इसमाविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी प्रस्तावास मान्यता देत पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठविला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश क्रमांक पगम/एमपीडीए/एसआर/०८/०१/२०२५ दिनांक १२ डिसेंबर २०२५ अन्वये क्रिश राठोड यास स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले आहेत. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या कठोर भूमिकेचे स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *