पुणे : पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र थेऊर यांच्या वतीने आयोजित भव्य ‘अजित कृषी महोत्सव २०२६’ (वर्ष पहिले) या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेचे अनावरण महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेतृत्व जयदादा अजित पवार उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या वतीने ता. हवेली येथील श्रीक्षेत्र थेऊर येथे ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘अजित कृषी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व जयदादा अजित पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कोरेकर उपस्थित होते.

प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी प्रदर्शनाची तयारी सुरू झाल्याची माहिती दिली. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय पीक पद्धतींसह पशुपक्षी प्रदर्शनाचाही समावेश करण्यात आला असून सुमारे २०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय शेती अवजारे, बियाणे, कीटकनाशके, हरितगृहे, कृषी जैविक तंत्रज्ञान, हॉर्टिकल्चर, मासेमारी, अक्वाकल्चर, डेअरी तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया उद्योग, वेअरहाउस, अपारंपरिक ऊर्जा, विपणन तंत्रज्ञान, कृषी बाजार, अर्थसाहाय्य संस्था, सेंद्रिय शेती, शेळी-मेंढी पालन, समूह शेती, शेतकरी बचत गट, दुग्धविकास आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

या निमित्ताने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, महिला व कृषिकन्यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास कल्याणकर इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशांत कल्याणकर, सीमा प्रशांत कल्याणकर तसेच प्रतिष्ठानचे समन्वयक बापू सोनवणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *