पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ड्राइव्ह
पुणे : विद्यार्थ्यांनी सीएसआरच्या माध्यमातून एनजीओतर्फे उपलब्ध केल्या जाणार्या विविध प्रकारच्या प्रशिक्षण तसेच रोजगार संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी केले.
पुणे : उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात विपला फाउंडेशन, पुणे व ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ड्राइव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विपला फाउंडेशनच्या प्रशिक्षक स्नेहल कांबळे, ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे म्हणाले की काही निकष पूर्ण करणार्या कंपन्यांना कायद्यानुसार दोन टक्के नफा सीएसआर अंतर्गत सामाजिक विकासासाठी खर्च करावा लागतो. विपला फाउंडेशनसारख्या एनजीओ त्या निधीचा उपयोग लहान मुलांच्या व महिलांच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आदी कारणांसाठी करतात. हे प्रशिक्षण व प्लेसमेंट ड्राईव्ह त्याचाच एक भाग आहे. यावेळी प्रशिक्षक स्नेहल कांबळे यांनी विद्यार्थिनींना रोजगाराच्या संधी, मुलाखत कौशल्ये व उद्योगक्षेत्रातील अपेक्षा याबाबत मार्गदर्शन केले.

हे प्रशिक्षण पूर्ण एक महिना रोज चालणार असल्याचे प्रशिक्षण व प्लेसमेंट ड्राईव्हच्या समन्वयक प्रा. गौरी ताकवणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रतीक आढाव यांनी केले. कार्यक्रमास प्रा. कमरुनिस्सा शेख, प्रा. अंजली शिंदे व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
…………