केंद्र क्र. ११११, महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे ९९६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत फेब्रुवारी/मार्च २०२६ मधील इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (दि. २०) रोजी उत्साहात सुरुवात झाली. केंद्र क्रमांक ११११ असलेल्या महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे उरुळी कांचन परिसरातील विविध शाळांमधील एकूण ९९६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत.

यामध्ये अमर एज्युकेशन इन्स्टिट्यूट (कोरेगाव मूळ), लोकनेते दादा जाधवराव विद्यालय (हिंगणगाव), न्यू इंग्लिश स्कूल (अष्टापूर), पुरोगामी विद्यालय (नायगाव), संत यादव बाबा विद्यालय (शिंदवणे), शिवराम बापू कुदळे विद्यालय (बोरी ऐंदी), सुभाष अण्णा कुल माध्यमिक विद्यालय (बोरी भडक), स्वामी विवेकानंद हायस्कूल (उरुळी कांचन), विद्या विकास मंदिर (यवत), डॉक्टर अस्मिता इंग्लिश मीडियम स्कूल (उरुळी कांचन) तसेच मुक्ताई मेमोरियल स्कूल (कुंजीरवाडी) आदी शाळांचा समावेश आहे.
परीक्षेच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त तथा खजिनदार राजाराम कांचन यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. “प्रामाणिकपणे अभ्यास करा. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर उत्तुंग भरारी मारा; यश तुमचेच आहे,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे विश्वस्त महादेव रावजी कांचन यांनीही विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य व केंद्र संचालक मान. भारत भोसले, उपप्रमुख विलास काशीद, दहावी विभाग प्रमुख संगीता शिर्के, मुख्याध्यापक सुरेश कांचन, रवींद्र पानसरे, सुभाष काळे तसेच सर्व प्रशासकीय कर्मचारी, अध्यापक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना उत्तम यशासाठी शुभेच्छा दिल्या.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सर्व सुविधा केंद्राकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केंद्रावरील सुविधा व सुरक्षा व्यवस्था पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.