पुणे : येथील न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूरमध्ये २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ८ वाजता विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अष्टापूर गावातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समारंभास स्कूल कमिटीचे अध्यक्ष हरिदादा कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, अष्टापूर गावच्या सरपंच पुष्पा कोतवाल, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य रमेशबापू कोतवाल, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष सुरेश तात्या कोतवाल, दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष शामराव वारे, शाळा कमिटी सदस्य तयाजी जगताप, नितीन मेमाणे, विजय कोतवाल, सुभाष कोतवाल, पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष केतन निकाळजे, शिवाजी कोतवाल, राजू कोतवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयाचे सहशिक्षक सुरेश ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, सामुदायिक कवायत तसेच मानवी मनोऱ्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे सादर केली. सहशिक्षिका सुशीला सातपुते यांनी भारतीय संविधानाची माहिती उपस्थितांना दिली.

मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी आपल्या मनोगतात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाद्वारे राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे व शिस्तबद्ध जीवन जगावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार सुहास भुजबळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *