पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या देशातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २३ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत विद्यापीठाच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलात पार पडणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार व ऑलिंपिक कांस्यपदक विजेते मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. हा सोहळा एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनएसएनआयएस) उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड तसेच डॉ. सुनीता कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमध्ये आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम) यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने देशातील विद्यापीठीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, तसेच विविध क्रीडाप्रकारांतून गुणवंत खेळाडू घडावेत, या उद्देशाने विश्वनाथ स्पोर्ट मिटची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यासह देशाच्या क्रीडा संस्कृतीत मोलाची भर घालणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, टेनिस, टेबल-टेनिस, खो-खो, वॉटर पोलो, बुद्धिबळ, जलतरण, इनडोअर रोईंग, बॉक्सिंग आणि तिरंदाजी अशा १५ क्रीडा प्रकारांत खेळाडूंमध्ये विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या १५० एकरांहून अधिक प्रशस्त व सुसज्ज कॅम्पसमध्ये ‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रीदवाक्यासह आयोजित व्हीएसएम–८ साठी आतापर्यंत देशातील १३५ हून अधिक शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमधील ५ हजारांहून अधिक खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. स्पर्धेच्या कालावधीत पाच दिवसांत १० हजारांहून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठ परिसरात वावर राहणार आहे.

या स्पर्धेसाठी अद्यापही नावनोंदणी सुरू असून, राज्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे तसेच क्रीडा संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. पद्माकर फड आणि डॉ. प्रतिभा जगताप यांनी केले आहे.

“यंदा विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या आठव्या हंगामात १५ क्रीडा प्रकारांमध्ये १३५ हून अधिक शिक्षण संस्थांमधील ५ हजारांहून अधिक खेळाडू आपली प्रतिभा सादर करणार आहेत. एमआयटी क्रीडा अकादमीतील विद्यार्थी व शिक्षकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या सहा दिवसांत संपूर्ण विद्यापीठ परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून जाणार आहे, असे प्रतिपादन डॉ. मंगेश कराड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *