पुणे : दौंड तालुक्यातील खामगाव गावठाण परिसरात वीर देवस्थानाच्या पूर्वेस असलेल्या सुमारे ३५ वर्षे जुन्या पवित्र वटवृक्षाची कथित बेकायदेशीर तोड केल्याचा प्रकार आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणात दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते विलास नागवडे यांनी दिल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर वटवृक्ष धार्मिक व पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून त्याची तोड तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी नागवडे यांनी दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी खामगावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी व तहसील कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या निवेदनाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

नागवडे यांच्या म्हणण्यानुसार, जालिंदर दळवी, शोभा दळवी, तुषार दळवी, शामराव शेळके व ठेकेदार अक्षय गायकवाड यांनी संगनमताने वटवृक्षाची तोड केली. इतकेच नव्हे, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वटवृक्षाच्या बुंध्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो पेटवून देण्यात आल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांचे संगनमत असल्याचा गंभीर दावा करत, संबंधित सर्व आरोपींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत तसेच राहुल काळे यांचे निलंबन करण्यात यावे, अशी ठाम मागणी नागवडे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पुणे वनसंरक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप अधिक तीव्र झाला आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आंदोलन अधिक तीव्र करत, दि. २० जानेवारी २०२६ रोजी वटवृक्ष तोड झालेल्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा लेखी इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. या इशाऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात वनविभाग व पोलिस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, याबाबत विचारले असता वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी, “संबंधित ठिकाणी पंचनामा करण्यात आला असून पुढील कारवाईनंतर माहिती दिली जाईल,” असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *