पुणे : उरुळी कांचन येथील एंजल हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. आंतरराष्ट्रीय खेळाडू व युवा आयकॉन शिवानी जाधव तसेच शरणजित कौर बिंद्रा, रीजनल अकॅडमी ट्रेनिंग मॅनेजर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सारेगमप लिटल चॅम्प मास्टर आदित्य फडतरे याच्या सुमधुर गणेश वंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री व ट्रस्टी अविनाश सेलूकर यांचे मार्गदर्शन लाभले.

“धरोहर अभ्युदय” ही संकल्पना या स्नेहसंमेलनात सादर करण्यात आली. पृथ्वीच्या निर्मितीपासून विविध युगांतील प्रवास ते आधुनिक रोबोटिक युगापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरणातून उलगडून दाखवला. सर्वच कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या सादरीकरणांना उपस्थित सुमारे २००० रसिक प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.

कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक व कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याध्यापिका रीना देशमुख यांनी मनोगतात सातत्यपूर्ण मेहनतीतून यश संपादन करण्याचा संदेश दिला तसेच शाळेच्या शैक्षणिक यशाचा आलेख मांडला.
या कार्यक्रमास उरुळी कांचनचे सरपंच मिलिंद जगताप, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, माजी उपसभापती हेमलता बडेकर, माजी उपसरपंच सागर कांचन, युवराज कांचन, उद्योजक संदीप कांचन, गणेश महाडिक, ओंकार कांचन, डॉक्टर वनारसे, प्रतिभा कांचन, पहिलवान शिवाजीराव महाडिक तसेच उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे व पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे उपस्थित होते.