पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दशकांपासून ज्या क्षणाची प्रतीक्षा तमाम मराठी माणूस आणि शिवसैनिक करत होता, तो क्षण अखेर उजाडला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा करून मराठी ऐक्याचा नवा अध्याय सुरू केला आहे.

“महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अधिकार वाचवण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आहोत,” असा ठाम निर्धार दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.

या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रस्तावना करताना खासदार संजय राऊत भावूक झाले. “आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश जसा महाराष्ट्रात आला, तसाच आज मराठी ऐक्याचा मंगल कलश उद्धव आणि राज यांच्या रूपाने आला आहे,” असे म्हणत त्यांनी या युतीमुळे मुंबईसह सर्व महापालिकांवर भगवा फडकणे निश्चित असल्याचा दावा केला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आक्रमक भूमिका घेत भाजपवर जोरदार टीका केली. “आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी संघर्ष केला. आज दिल्लीतील सत्ताधीशांना मुंबई खुपत आहे. आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि हे नाते आता तुटणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. भाजपच्या “कटेंगे तो बटेंगे” या नरेटिव्हवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “चुकाल तर संपाल.”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राज्यात सध्या पक्ष पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. अशा काळात महाराष्ट्राला स्थिरतेची गरज आहे.” ही युती केवळ निवडणुकीपुरती नसून महाराष्ट्राच्या हितासाठी असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. “मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमच्याच युतीचा असेल,” असा निर्धारही राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

एकूणच उद्धव–राज ठाकरे यांची ही युती मुंबईच्या राजकारणातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी ठरणार असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *