पुणे: सोरतापवाडी पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुदर्शन चौधरी व लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोरतापवाडी येथे ‘बळीराजा मोफत आरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोरतापवाडी, तरडे, शेंदवणे, वळती तसेच हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातून जवळपास साडेचार हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला.

या शिबिरात १६० मोतीबिंदू रुग्ण आढळून आले, तर सुमारे १,७०० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच १८० रुग्णांची स्कॅन व एमआरआयसाठी नोंदणी करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी अत्याधुनिक कृत्रिम हात-पाय व कॅलिपर्ससाठी सुमारे ३० नागरिकांनी नोंदणी केली.
या शिबिरात हाडांचे आजार, कॅन्सर, दंतरोग, लहान मुलांचे आजार, किडनी विकार, एक्स-रे तपासणी यासह विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. रुबी हॉलचे डॉक्टर, डी. वाय. पाटील फिजिओथेरपी अँड डेंटल हॉस्पिटल, श्री काशीबाई नवले हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, विश्वराज हॉस्पिटल, प्राईम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यासह पुण्यातील नामांकित अत्याधुनिक रुग्णालयांनी या शिबिरात सहभाग नोंदवला.

या भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शशिकांत गायकवाड, रोहिदास शेठ उंद्रे, दिलीप काळभोर, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, प्रकाश हरपळे, लक्ष्मण केसकर यांच्यासह वळती गावचे सरपंच एल. बी. कुंजीर तसेच पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात अशा मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिराचे आयोजन प्रथमच होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता ग्रामीण भागातील आरोग्य समस्या किती गंभीर आहेत, हे स्पष्टपणे समोर आले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.