पुणे : युवकांनी आज घेतलेले निर्णय उद्याच्या अस्तित्वावर परिणाम करणारे असतात. त्यामुळे वर्तमानाचा विचार करताना भविष्यातील पिढ्यांची जबाबदारी लक्षात घेतली तरच शाश्वत विकास शक्य होईल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्याम वासनीकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने टिळेकरवाडी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते बोलत होते.

‘शाश्वत विकास आणि युवक ’ या विषयावर आयोजित प्रबोधनपर व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. वासनीकर म्हणाले, मानवाने भौतिक प्रगती साधली असली तरी ती खरोखरच मानवकल्याणाभिमुख आहे का, हा प्रश्न आज गंभीरपणे विचारात घ्यावा लागतो. गरज आणि हव्यास यातील फरक ओळखणे हीच शाश्वत विकासाची खरी कसोटी आहे. आर्थिक प्रगती साधताना पर्यावरणीय संतुलन राखणे आणि भावी पिढ्यांचे हित जपणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विकासाची दिशा विनाशाकडे जाऊ शकते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अक्षय शरद टिळेकर होते. त्यांनी युवकांनी समाजहिताच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. उपाध्यक्ष धनंजय भीमराव टिळेकर, सरपंच गोवर्धन टिळेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. भाऊसाहेब तोरवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सरपंच गोवर्धन टिळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक सहभागामुळे गावाच्या विकासाला बळ मिळत असल्याचे नमूद करत उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणिता फडके यांनी केले, तर आभार प्रा. गौरव टिळेकर यांनी मानले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी स्वयंसेवकांनी महानुभवपंथीय श्रीकृष्ण मंदिर परिसरापासून टिळेकरवाडी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंतच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.