पुणे : पर्यावरण रक्षण ही काळाची गरज नसून प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, हा संदेश देत द ग्रीन लीगसी वीक अंतर्गत मांजरी कोलवडी येथील अभिनव पब्लिक स्कूल आणि ‘ गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘EPIC SHOWCASE 2.0’ हा आंतरशालेय महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक कीर्तीचे पर्यावरणप्रेमी ‘पिपल बाबाजी’ यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात मांजरी व हडपसर परिसरातील तब्बल ५२ शाळांमधील सुमारे १,००० ते १,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कला व हस्तकला, नृत्य, नाट्य, क्रिकेट, कराटे, तायक्वांदो आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले. सुमारे ८०० हून अधिक पालकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला महोत्सवी स्वरूप प्राप्त झाले.
स्पर्धांमध्ये फुरसंगी येथील विबगेअर राईज स्कूलने आठपेक्षा अधिक ट्रॉफी जिंकत वर्चस्व सिद्ध केले. युनिक एसबीआय स्कूल (हडपसर), गुरु इंटरनॅशनल, ल्युमिनस स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, द स्कॉलर्स अकॅडमी, होली एंजल्स, ज्ञानदीप स्कूल, सोली पूनावाला स्कूल, साधू वासवानी स्कूल आणि अभिनव पब्लिक स्कूल (सिंहगड) यांनीही विविध गटांत यश संपादन केले.

पिपल बाबाजींच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘ गिव्ह मी ट्रीज ट्रस्ट ’ तर्फे शाळेच्या ग्रंथालयाला ६० पुस्तके आणि ६० हून अधिक वृक्ष भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालक, कर्मचारी यांना फळझाडे, औषधी व फुलझाडांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या डॉ. काजल छतीजा उपस्थित होत्या. अभिनव चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलानी यांनी शाश्वत भविष्याची गरज अधोरेखित केली. प्राचार्या डॉ. अश्विनी पानसरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचा समारोप “Save Earth – Save Plants –Save Sun या घोषणेसह करण्यात आला.