पुणे : तालुक्यातील शेलुखडसे येथील पत्रकार वसंत खडसे व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, योग्य कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे, अशी माहिती पत्रकारांच्या पत्नी सौ. अनिता वसंत खडसे यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, पत्रकार वसंत खडसे हे एका दैनिकात उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात ‘पोकरा’ योजनेतील कथित भ्रष्टाचाराबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वृत्तमालिका प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्तमालिकेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत.
या संदर्भात पत्रकार खडसे यांनी पुराव्यानिशी राज्याचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार तपास अधिकारी संतोष वाळके यांच्या पथकाने २६ डिसेंबर रोजी शेलुखडसे येथे भेट देऊन संबंधित लाभार्थ्यांच्या शेतशिवाराची पाहणी केली
तपासादरम्यान ज्ञानेश्वर गजानन खडसे व संजय गजानन खडसे यांच्या गट क्रमांक ६०२ मधील नेटशेड व घेतलेल्या लाभांची तपासणी करण्यात आली. तसेच मयत गजानन निवृत्ती खडसे व त्यांच्या पत्नी लक्ष्मी गजानन खडसे यांच्या गट क्रमांक ६३३ मधील कथित फळबाग, वनीकरण व जुनी विहीर असतानाही पोखरा योजनेतून घेतलेल्या नव्या विहिरीची पाहणी करण्यात आली.
या तपासामुळे अवैध लाभ उघडकीस येण्याची शक्यता लक्षात येताच संबंधित कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले. त्यातूनच आरोपी संजय गजानन खडसे व त्यांची आई लक्ष्मी गजानन खडसे यांनी शेजारच्या शेतात काम करत असलेल्या सौ. अनिता वसंत खडसे यांना शिवीगाळ करत, पत्रकार खडसे यांनी विरोधात बातम्या का प्रसिद्ध केल्या, असा जाब विचारून त्यांना व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याबाबत माहिती मिळताच पत्रकार वसंत खडसे यांनी रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवून घेत ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रंजवे पुढील तपास करीत आहेत.