पुणे: समाजवाद, समता आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत असलेल्या आढाव यांची प्राणज्योत अखेर मालवली. रात्री ८.२५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. राज्यभरातून कष्टकऱ्यांचा आधारवड कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, “श्रमिकांचे बाबा” म्हणून ओळखले जाणारे आढाव यांच्या जाण्याने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला आहे. ही भरून न येणारी हानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या एकाकी मजूर चळवळीचा आणि समतेवरील अढळ विश्वासाचा उल्लेख करून त्यांना अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले, “हमाल-रिक्षा पंचायत ते कचरा वेचकांच्या संघटनांपर्यंत लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात त्यांनी आशा निर्माण केली.” केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आढाव यांच्या पुणे महापालिकेतील कामाची आठवण करून दिली. तर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्यांच्या तत्त्वनिष्ठ कार्याचा गौरव केला.

शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी “कष्टकरी समाजाचा सत्यशोधक आवाज शांत झाला” अशी भावना व्यक्त केली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी म्हणाले, “मुस्लिम सत्यशोधक हे नाव त्यांच्याच सुचनेतून जन्माला आले. त्यांचा वारसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली.”

वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. बाबा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, तसेच कपिल पाटील यांनीही भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. बाबा आढाव यांनी मजूर चळवळीला आयुष्य अर्पण केले. त्यांच्या जाण्याने सामाजिक-राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून राज्यभरातून शोकसंदेशांचा ओघ सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *