पुणे : ‘असा मी अशी मी’ या अमोल शेटगे दिग्दर्शित आणि सचिन नाहर व अमोग मलाविया निर्मित बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा भव्य ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, मराठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लंडनच्या मोहक लोकेशन्सवर चित्रित झालेली ही प्रेमकहाणी ग्लॅमर, भावनिक वळणं आणि आंतरराष्ट्रीय भव्यतेचा मिलाफ असलेली असल्याचे ट्रेलरमधून प्रभावीपणे जाणवते.
ट्रेलरमध्ये अभिनेता अजिंक्य रमेश देव एक देखणा, मोकळ्या स्वभावाचा आणि थोडासा कॅसानोव्हा टच असलेला भारतीय फोटोग्राफर म्हणून दिसतो. त्याच्या उलट, अभिनेत्री तेजश्री प्रधान परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणारी लंडनमध्ये ट्रॅव्हल एजन्सी चालवणारी मुलगी अशी साकारली आहे. लंडनच्या चमकदार लोकेशन्समुळे त्यांच्या प्रेमाची प्रत्येक फ्रेम अधिकच उठून दिसते. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणावर, रोल्स रॉयसची लक्झरी, हार्टलेबरी कॅसलचे राजेशाही लोकेशन्स आणि इतर सुंदर ठिकाणांवर चित्रिकरण झाल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर यंदाच्या गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला असून ज्यूरी आणि प्रेक्षकांकडून प्रशंसादेखील मिळाली आहे. ट्रेलरमध्ये एका टप्प्यावर तेजश्रीची अचानक अजिंक्यपासून दूर जाण्याची झलक दाखवली असून, या निर्णयामागचं रहस्य प्रेक्षकांच्या उत्सुकतेचं केंद्रबिंदू ठरत आहे.
अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी, यशश्री मसुरकर तसेच भारतीय आणि ब्रिटिश कलाकारांची मजबूत फळी चित्रपटात झळकणार आहे. मॅक्समस लिमिटेड प्रस्तुत या चित्रपटात डी.ओ.पी. सोपान पुरंदरे आणि संगीतकार निलेश मोहरीर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
‘असा मी अशी मी’ हा सिनेमॅटिक प्रवास येत्या २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
