पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळ आणि कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुल संचालित ट्रिनिटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला’ ही त्रिदिवसीय ज्ञानयज्ञाची पर्वणी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि प्रेरणादायी वातावरणात दिमाखात पार पडली. ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्यांचा सुरेख संगम घडवणाऱ्या या व्याख्यानमालेने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा दिली.

या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या विचारांचा ठेवा उलगडत विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे दिले. पुणे आकाशवाणीचे निवृत्त निवेदक बाबासाहेब खराडे, शिवव्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम आणि प्रा. डॉ. विलीना इनामदार यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहून आपल्या प्रभावी वक्तृत्वाने सभागृह भारावून टाकले.
पहिल्या दिवशी बाबासाहेब खराडे यांनी ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ या काव्यवाचनातून विनोदाचा रसिक दरवळ निर्माण केला. विविध कवींच्या हलक्याफुलक्या रचनांमधून त्यांनी उपस्थितांना खळखळून हसवलेच, पण जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मौलिक संदेशही दिला. त्यांच्या सादरीकरणामुळे सभागृहात आनंदाची लहर उसळली.

दुसऱ्या दिवशी ‘विद्यार्थ्यांसाठीची प्रेरणा : छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर प्राचार्य प्रदीप कदम यांनी प्रभावी विचार मांडले. छत्रपतींच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्यनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन करत त्यांनी तरुणाईत धाडस, विचारसंपन्नता आणि समाजपरिवर्तनाची जाज्वल्य जिद्द निर्माण होण्याची गरज अधोरेखित केली. “धाडस, विचारांचे इंद्रधनुष्य आणि परिवर्तनाची आस ज्याच्या मनात आहे, तोच खरा विद्यार्थी,” असे ते ठामपणे म्हणाले.

तिसऱ्या दिवशी प्रा. डॉ. विलीना इनामदार यांनी ‘सौंदर्य मनाचे आणि सौंदर्य शरीराचे’ या विषयावर अंतर्मुख करणारे मार्गदर्शन केले. “जोखीम पत्करणे हे मनाचे सौंदर्य, परिश्रम हे कर्तृत्वाचे चिन्ह आणि इतरांचा मान राखणे हीच खरी संस्कृती,” या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मपरिवर्तनातून समाजपरिवर्तन घडवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी या व्याख्यानमालेचे महत्त्व अधोरेखित करत, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, वैचारिक आणि सामाजिक विकास अधिक सक्षमपणे घडतो,” असे नमूद केले. भविष्यातही अशाच ज्ञानवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्याचा महाविद्यालयाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे समन्वयक व उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब घोडके यांनी आपल्या मनोगतात, या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच जीवनमूल्यांची अमूल्य शिकवण मिळाल्याचे सांगितले. विविध वक्त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक परिवर्तन घडल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभवी जाधव यांनी समर्थपणे केले, तर प्रा. धनाजी व्यवहारे यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष कल्याणराव जाधव तसेच संचालक निवृत्त मेजर जनरल समीर कल्ला यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *