पुणे : उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून या गटासाठी शंकर बडेकर यांचे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येत आहे. उरुळी कांचनसह शिंदवणे, तरडे, सोरतापवाडी, टिळेकरवाडी या गावांतील सर्वसामान्य नागरिकांपासून ते गाव पुढाऱ्यांपर्यंत सर्वांनी एकमताने बडेकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
उमेदवार कोण असावा, पात्रतेचे निकष काय असावेत, यावर उरुळी कांचन येथील हॉटेल सोनाई येथे पंचक्रोशीतील नागरिक व सर्वपक्षीय नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (ता. १८) पार पडली. या बैठकीत नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा, तळागाळात काम करणारा, विकासाभिमुख आणि गटातील च असावा. याच निकषांवर उपस्थितांनी एकमताने शंकर बडेकर हाच योग्य आणि सक्षम उमेदवार असल्याचा सूर लावला.

बैठकीदरम्यान काही पक्षांच्या प्रतिनिधींनी थेट ऑफर देत “आमचा पक्ष तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे, तुम्ही आमच्याकडून निवडणूक लढवा. तुमच्या कामावर विश्वास आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली. तर काहींनी माणूस महत्त्वाचा असल्याचे सांगत, तिकीट कोणत्याही पक्षाचे असो, बडेकर यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करू, असा निर्धार व्यक्त केला.

एका कार्यकर्त्याने तर ठामपणे सांगितले की, शंकर बडेकर कोणत्याही पक्षातून किंवा अपक्ष जरी उभे राहिले तरी शंभर टक्के निवडून येतील. अमोल बालवडकर यांच्या धर्तीवर बडेकरही निवडणूक जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शांत, संयमी आणि प्रामाणिक स्वभावाचे शंकर बडेकर हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. शेवटी बडेकर यांनी नम्र पण ठाम भूमिका घेत सांगितले की, “गाव जो उमेदवार देईल तो मला मान्य आहे. गावाने मला संधी दिली तर तिचे सोनं करीन आणि जनतेची प्रामाणिक सेवा करीन.” त्यांच्या या भूमिकेमुळे पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडणूक लढतीत बडेकरांचे पारडे जड मानले जात आहे.