पुणे: उरुळी कांचन पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपला मास्टरस्ट्रोक टाकत कोमल गणेश कांबळे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.

स्थानिक पातळीवर सामाजिक, शैक्षणिक आणि महिला प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडणाऱ्या कोमल कांबळे या नावाने ओळखल्या जातात. गेल्या काही वर्षांत त्यांनी उरुळी कांचन परिसरात थेट जनसंपर्क, तळागाळातील प्रश्न आणि प्रशासनावर दबाव निर्माण करणारी भूमिका घेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हाच ‘ग्राउंड कनेक्ट’ पाहून राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून “या वेळी पंचायत समिती गण आपलाच” असा आत्मविश्वास कार्यकर्ते खुलेआम व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे महिलांचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर कोमल कांबळे यांनी थेट भूमिका घेतल्याने त्यांना सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
एकंदरीत, कोमल गणेश कांबळेंच्या उमेदवारीने उरुळी कांचन पंचायत समिती गणातील राजकारणाला वेगळीच धार आली असून आगामी काळात येथे जोरदार राजकीय सामना पाहायला मिळणार, हे मात्र नक्की.