पुणे : जगात कोणत्याही क्षेत्रात गुरु व धर्मग्रंथांशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. मनुष्य मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आर्थिक सुबत्ता व भौतिक सुख मिळवतो; मात्र त्यामुळे अहंकार, वासना निर्माण होऊन षडरिपूंचा उदय होतो आणि दया-धर्म लोप पावतो. फक्त आध्यात्मिक गुरु व धर्मग्रंथ अभौतिक सुखाचे ज्ञान देऊन धर्म धारण करण्याची शक्ती देतात. धर्मामुळे दया निर्माण होते व अहंकार नष्ट होतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे (उरुळी कांचन) यांनी व्यक्त केले.

वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती ह.भ.प. कृष्णा महाराज तांबे यांच्या प्रेरणेने तसेच श्री संत तुकाराम महाराज बीज व श्री संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्यानिमित्त ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे व अखंड हरिनाम सप्ताह जेऊर यांच्या वतीने येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित प्रवचनात डॉ. भोळे बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की मनुष्य जीवनभर विकर्म, कर्म व अकर्म करीत असतो; परंतु निष्काम कर्मयोगाने जीवनाचे रहस्य शोधता येते आणि जीवन कसे जगावे याचा उलगडा होतो. जीवनभर शांती मिळणे आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्षप्राप्ती होणे हेच जीवनाचे खरे रहस्य व उद्दिष्ट आहे. प्रत्येकाने नीती, न्याय व विवेकाने अहंकारशून्य वागले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या सप्ताहात ह.भ.प. प्रवचनकार शंकर महाराज ठोंबरे, प्रियंका महाराज तांबे, वैभव महाराज धुमाळ, गोरक्षनाथ महाराज तांबे, ह.भ.प. बापू महाराज गायकवाड (वाघापूर), शर्मिला महाराज, शिवाजी बरकेडे महाराज, ह.भ.प. बापूराव महाराज धायगुडे व जालिंदर महाराज कुंभार यांच्या प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच ह.भ.प. अनिकेत महाराज ठोंबरे (कोपरडे), वंदनाताई महाराज काकडे (थेऊर), ज्ञानेश्वर कृष्णा तांबे महाराज, दिव्याताई महाराज शिंदे (जेजुरी), वैष्णवी ताई महाराज जाधव (आळंदी), नारायण महाराज शिंदे (लोणंद) व मनोज महाराज साळुंखे पांडे यांच्या सुस्वर कीर्तनांनी उपस्थितांना भक्तिरसात रंगवले. ह.भ.प. गायनाचार्य सोमनाथ महाराज मोहिते यांचे काल्याचे कीर्तनही झाले.

या कार्यक्रमास ह.भ.प. बापू गायकवाड महाराज वाघापूरकर, आयोजक ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, जनार्दन श्रीरंग तांबे, ओमप्रकाश संपत बरदडे तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. जेऊर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे भव्य मंडपात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *