पुणे : चऱ्होली खुर्द आणि चऱ्होली बुद्रुक यांना जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल रहदारीस सुरक्षित करण्यासाठी त्याच्या बेअरिंग क्षमतेत वाढ करून देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत पूल वाहतुकीस बंद राहणार असल्याने सर्व प्रकारच्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या अनुषंगाने आळंदीत नियोजनपूर्व समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मारुती जगताप होते. त्यांनी उपस्थित नागरिक, पदाधिकारी, ग्रामस्थ, पोलीस व विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत वाहतूक नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने देवदर्शनासाठी येणारे भाविक, वारकरी, लग्नसमारंभाची वाहने, औद्योगिक वसाहतीतील कामगार बसेस आणि अवजड मालवाहतूक यांचा विचार करून पुढील काळातील वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला.
पुलाच्या कामकाजाच्या कालावधीत आळंदी व परिसरात अवजड वाहनांना प्रवेश न देता पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच आळंदी-मरकळ रस्त्यासह जोड रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचेही आवाहन करण्यात आले.
बैठकीत गर्दीच्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग टाळण्याबाबत उपाययोजना सुचविण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पाटील यांनी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत, जोड रस्त्यांचा विकास पीएमआरडीए मार्फत होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले .
या बैठकीस पोलीस अधिकारी, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, शांतता समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पर्यायी मार्गांच्या वापरासाठी जनजागृती करण्याची ग्वाही दिली.
