पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘मणिफेस्ट २०२६’ अंतर्गत ‘रेट्रो-बॉलिवूड-मिसमॅच डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जुन्या हिंदी चित्रपटांतील कलाकारांच्या वेशभूषेत तसेच हटके मिसमॅच पोशाखात सहभाग घेत महाविद्यालय परिसरात जुन्या बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचे चित्र साकारले.

कार्यक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी नटसम्राट नाना पाटेकर, आलिया भट, निळू फुले, गंगुबाई, मंजुलिका आदी दिग्गज कलाकारांच्या शैलीत सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व सादरीकरणाला प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून भरभरून दाद मिळाली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वाढविण्याचा उद्देश साध्य होत असल्याचे प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी नमूद केले.

कार्यक्रमावेळी स्नेहसंमेलनाध्यक्षा व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, कला विभाग प्रमुख डॉ. समीर आबनावे, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वैशाली चौधरी यांची उपस्थिती होती.
स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक रोहित थोरात (तृतीय वर्ष वाणिज्य), द्वितीय क्रमांक व्यंकटेश भोंगळे (तृतीय वर्ष संगणकशास्त्र), तृतीय क्रमांक ऐश्वर्या लोखंडे (तृतीय वर्ष वाणिज्य) तर उत्तेजनार्थ रोहन पात्रे (प्रथम वर्ष कला) यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षल भोसले यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. समीर आबनावे, प्रा. ज्ञानदेव पिंजारी, प्रा. अनुजा झाटे, प्रा. वैशाली चौधरी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. झेबा तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी, सांस्कृतिक समिती, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.